उत्पत्ति 13:1-12
Marathi Bible: Easy-to-Read Version
अब्राम कनान देशाकडे माघारे येतो
13 अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला व तो आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि त्यांची सर्व मालमत्ता घेऊन नेगेब मधून प्रवास करीत गेला. 2 त्या काळी अब्राम फार श्रीमंत झाला होता; त्याच्याजवळ पुष्कळ गुरेढोरे, शेरेडेमेंढरे, गाढवे व उंट तसेच सोने चांदी इत्यादी भरपूर होते.
3 अब्राम इकडेतिकडे सतत प्रवास करीत राहिला; त्याने नेगेब सोडले व तो पुन्हा मागे बेथेलला गेला; बेथेल व आय यांच्या दरम्यान याच ठिकाणी त्याने त्याच्या कुटुंबासह तळ दिला होता व 4 परमेश्वराची उपासना करण्याकरिता त्याने एक वेदी बांधली होती, म्हणून त्याच ठिकाणी अब्रामाने परमेश्वराची उपासना केली.
अब्राम व लोट वेगळे होतात
5 या काळात लोट अब्रामाबरोबर प्रवास करीत होता. लोट याजकडे खूप, गुरेढोरे व तंबू होते 6 अब्राम व लोट यांची गुरेढोरे इतकी वाढली की त्या दोघांना एकत्र राहाण्यास ती जागा व तो प्रदेश पुरेना, 7 शिवाय अब्राम व लोट यांच्या गुराख्यांची एकसारखी भांडणे होऊ लागली; त्याकाळी त्या देशात कनानी व परिज्जी लोकांची वस्ती होती.
8 तेव्हा अब्राम लोटास म्हणाला, “तुझ्या माझ्यामध्ये तसेच तुझे व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडणतंटा नसावा, कारण आपण सगळे भाऊबंद आहोत. 9 तेव्हा आपण वेगळे व्हावे हे आपल्यासाठी बरे आहे तुला पाहिजे तो प्रदेश तू निवड; तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”
10 लोटाने यार्देन दरीकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्याला दिसले (परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश केला त्याच्या आधीची ही घटना आहे. त्यावेळी थेट सोअरापर्यंत पसरलेले यार्देन नदीचे खोरे परमेश्वराच्या बागे सारखे सुंदर होते मिसर मधील प्रदेशाप्रमाणे ही भूमी चांगली होती.) 11 तेव्हा लोटाने यार्देन नदीच्या खोऱ्यात राहाणे निवडले; मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरवात केली; 12 अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या तळवटीतील शहरातून राहिला; लोट दक्षिणेकडे दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तबू ठोकला.
Read full chapter2006 by Bible League International